मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितिची बैठक काल वांद्रे पूर्व येथील चेतना कॉलेज मध्ये संपन्न झाली. या बैठकीत उत्तर मुंबईतील मालाड पश्चिम मालवणी येथील टिपू सुल्तान मैदानावरुन पुन्हा घमासान बघायला मिळाले.तर या उद्यानाला स्वातंत्र्यसैनिक अशफ़ाक उल्ला खान यांच्या नावाच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस-भाजपात अखेर एकमत झाल्याचे दिसून आले.तर त्याआधी उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यात शाब्दीक खडाजंगी देखिल पाहायला मिळाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालाड पश्चिम मालवणी येथे महविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन मंत्री असलम शेख यांनी आपल्या आमदार फंडातून दि,२६ जानेवारी २०२२ मध्ये एका मैदानचे नूतनीकरण केले होते. यावेळी आ.असलम शेख यांनी या मैदानाचे टिपू सुलतान असे नामकरण केले होते.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितिची बैठक मालवणी येथील 'टिपू सुल्तान' मैदानाच्या नामकरण मुद्द्यावरुन ही बैठक चांगलीच गाजली. गेल्या काही महिन्यांपूर्वी मालवणी येथील मैदानाला 'टिपू सुल्तान' यांचं नाव देण्यावरुन कॉंग्रेस-भाजपात फार मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता.
चेतना कॉलेज येथे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मैदानाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला.
टिपू सूलतान यांच्या उद्यानाची असलेली पाटी काढून भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मैदानाला स्वातंत्र्यसैनिक अशफ़ाक उल्ला खान यांचं नाव देण्याची मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही आपल्या मागणी संदर्भात उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत मैदानाला अशफ़ाक उल्ला खान यांचे नाव दिले नाही तर आपण स्वत: जाऊन त्या मैदानाचं नामकरण करण्याची भूमिका आक्रमकपणे शेट्टी यांनी मांडली.
पालकमंत्री लोढा यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपला आक्रमक बाणा कायम ठेवत एक लोकप्रतिनिधी या नात्याने मला भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य नसल्यास उर्वरीत मुद्दे मांडणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती बैठकीत कॉंग्रेस-भाजपात मिले "सूर मेरा तुम्हारा"चित्र पाहायला मिळाले. आमदार अस्लम शेख यांनी खासदार शेट्टी यांच्या सूरात सूर मिसळत स्वातंत्र्य सैनिक अशफ़ाक उल्ला खान यांचे नाव मैदानाला देण्यासंदर्भात आपण देखील यापूर्वी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. या उद्यानाला अशफ़ाक उल्ला खान यांचे नाव देण्यावर कॉंग्रेस-भाजपात अखेर एकमत झाल्याची माहिती आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"