उमेदवारासाठी काँग्रेसची पनवेलात शोध मोहीम
By admin | Published: September 23, 2014 11:24 PM2014-09-23T23:24:16+5:302014-09-23T23:24:16+5:30
एकीकडे उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुक फिल्डिंग लावताना दिसताहेत. मात्र पनवेलमध्ये काँग्रेसला उमेदवारी घ्या
पनवेल : एकीकडे उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुक फिल्डिंग लावताना दिसताहेत. मात्र पनवेलमध्ये काँग्रेसला उमेदवारी घ्या... अशी म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली आहे. आर. सी. घरत यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यामुळे नारायण ठाकूर यांच्याबरोबर जिल्हा काँग्रेसचे चिटणीस मुस्तफा याकूब बेग यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे.
पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला काँग्रेस पक्षाने शह दिला आहे. दोन्ही पक्ष पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. २००९ पूर्वी पन्नास वर्षांत पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापला काँग्रेसच्या उमेदवाराने टक्कर दिली आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दहा वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला बळकटी मिळाली. गेल्या काही वर्षांत पनवेल आणि उरणमध्ये काँग्रेसला चांगले दिवस आले, संघटना आणि कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली होती. मात्र ठाकूर यांनी खारघर टोलनाक्यावरून काँग्रेस पक्ष सोडल्याने या ठिकाणाहून कोण निवडणूक लढविणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे असल्याने पक्षाला येथून उमेदवार उभा करावा लागणार आहे. प्रशांत ठाकूर आणि बाळाराम पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवारांना शह देण्यासाठी वजनदार उमेदवाराची गरज आहे.
जिल्ह्यातील बड्या काँग्रेस नेत्यांनी मुन्नाभाई यांनी भेट घेवून निवडणूक लढविण्यास गळ घातली आहे. ठाकूर यांनी आपल्या हातात कमळ घेतल्याने पनवेलमधून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत हे निवडणूक लढवतील असे बोलले जात होते. मात्र मी पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष देणार असून उमेदवारी नको असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले आणि उमेदवाराचा शोध सुरू झाला असून पनवेल विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची मदार आता अल्पसंख्याक आणि दलित समाजाच्या मतांवर आहे. (वार्ताहर)