मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसचा कँडल मार्च, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:02 PM2023-07-31T21:02:12+5:302023-07-31T21:03:08+5:30
पोलिसांकडून आझाद मैदान-सीएसटी स्टेशनजवळ मार्च अडवण्यात आला.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढून महिलांना ज्या अपमानकारक व अमानवी कृत्याला सामोरे जावे लागले. या घटनेला २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा त्या समाजकंटकांवर केंद्र सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. अशा केंद्रातील निष्क्रिय भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईकाँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेस कार्यालय येथून 'कँडल मार्च' काढण्यात आला.
यावेळी पोलिसांकडून आझाद मैदान-सीएसटी स्टेशनजवळ हा मार्च अडवण्यात आला. या कॅडल मार्च मध्ये माजी खासदार संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी आमदार बाबा सिद्दीकी, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, आमदार जिशान सिद्दीकी, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागूल तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या 'कँडल मार्च'मध्ये सहभागी काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील निष्क्रिय भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व त्यांचा निषेध केला. पोलिसांनी आझाद मैदानजवळ हा मार्च अडवला व सर्व प्रमुख आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.