काँग्रेसला भगव्याचे आव्हान?

By Admin | Published: July 29, 2014 12:00 AM2014-07-29T00:00:47+5:302014-07-29T00:00:47+5:30

सागरी किनारपट्टीवरचा महत्वाचा मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात १९६२ पासून ११ निवडणुका झाल्यात

Congress challenge saffron | काँग्रेसला भगव्याचे आव्हान?

काँग्रेसला भगव्याचे आव्हान?

googlenewsNext

दीपक मोहिते, वसई
सागरी किनारपट्टीवरचा महत्वाचा मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात १९६२ पासून ११ निवडणुका झाल्यात. यापैकी ७ निवडणुका काँग्रेसने जिंकल्या तर मार्क्सवाद्यांनी दोन वेळा बाजी मारली. तर दोन वेळा राष्ट्रवादीने बाजी मारली.
१९६२ साली काँग्रेसच्या शामराव पाटील यांनी बाजी मारली होती. त्यावेळी हा मतदारसंघ सर्वसाधारण होता. त्यांना १३,५३३ मते मिळाली होती. तर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या गोदुताई परुळेकर यांचा पराभव केला होता. परुळेकरांना ११,४०३ मते मिळाली होती. म्हणजेच शामराव पाटील यांचा विजय २,१३० इतक्या निसटत्या मताधिक्याने घडून आला होता. त्यानंतर १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसच्या महादेव कडू यांनी २०,६२७ मतांनी विजय मिळविला होता. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एन.आर. ओझऱ्या यांचा ६, १५८ मतांनी पराभव केला होता. ओझऱ्या यांना १४,४६९ मते मिळाली होती. १९७२ च्या निवडणुकीत महादेव कडू यांनी २६,३७८ मते मिळवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लहानु शिडवा कोम यांचा पराभव केला होता. कोम यांना २३,६८५ मते मिळाली होती. मतांची ही आकडेवारी पाहता कडू यांचे मताधिक्य २,६९३ एवढे होते. कडू यांच्या विजयाने या मतदार संघात काँग्रेसच्या विजयाची हॅट्ट्रीक साधली गेली होती. तिला पहिला सुरुंग १९७८ च्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंकर माऱ्या चव्हाण यांनी २६,२२४ मते मिळवून लावला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे महादेव गोपाळ कडू यांना २१,५१४ मते मिळाली होती. चव्हाण यांचे मताधिक्य ४,७१० मतांचे होते. १९८० मध्ये झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसच्या महादेव कडू यांनी या पराभवाचा बदला घेतला. या निवडणुकीत त्यांनी २५,५२२ मते मिळवून मार्क्सवादी उमेदवार शंकर चव्हाण यांचा पराभव केला. चव्हाण यांना १८,७५३ मते मिळाली. कडू यांचे मताधिक्य ६,७९९ एवढे होते. त्यानंतर १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने तरुण कार्यकर्ता असलेल्या शंकर सखाराम नम यांना संधी दिली. त्यांनीही या मतदारसंघावर असलेले काँग्रेसचे वर्चस्व अधिक मजबूत केले. त्यांना ३४,३८५ मते मिळाली. त्यांनी मार्क्सवादी उमेदवार गंगाराम सुतार यांचा पराभव केला. त्यांना १०,६८५ मते मिळाली होती. म्हणजेच नम यांचे मताधिक्य २३,७०० एवढे विक्रमी होते. मार्क्सवाद्यांनी विधानसभा निवडणुकीत प्राप्त केलेल्या मतांचा निच्चांक होता. १९९० च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने नम यांनाच उमेदवारी दिली. त्यांनी या निवडणुकीत ६२,८१३ मते प्राप्त केली. त्यांनी शिवसेनेच्या रामकृष्ण केणी यांचा पराभव केला. त्यांना १९,९३७ मते मिळाली. या मतदारसंघात यानिमित्ताने शिवसेनेचा चंचूप्रवेश झाला होता. या लढतीत नम यांचे मताधिक्य ४२,८७६ होते. या निवडणुकीत प्रथमच मार्क्सवादी साफ धुतले गेले होते. आजवरच्या निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहण्याची परंपरा पुसली गेली होती. याचे पारितोषिक नम यांना काँग्रेसने राज्यमंत्रीपद बहाल करून दिले होते. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वत्र सेना-भाजप युतीचा झंझावात असतांनाही नम यांनी या मतदारसंघातील काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले. एवढेच नव्हेतर त्यांनी आपली मतेही मोठ्या प्रमाणात वाढवली. या निवडणुकीत त्यांना ६२,८१३ मते मिळाली तर शिवसेनेच्या किसन कणवी यांना ४०,४५८ मते मिळाली. म्हणजे नम यांचे मताधिक्य २२,३५५ एवढे होते. त्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची युती नव्हती राष्ट्रवादी स्वतंत्र लढली होती. या मतदारसंघात कृष्णा घोडा यांनी प्रथमच विजय मिळवून राष्ट्रवादीचा झेंडा येथे रोवला. त्यांना ४०,८९५ मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेच्या ईश्वर धोडी यांचा पराभव केला. धोडी यांना २९,५०८ मते मिळाली होती. तर घोडा यांचे मताधिक्य ११,३८७ एवढे होते. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होती. आधीच्या वर्चस्वामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. राष्ट्रवादीने घोडा यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यावेळी या मतदारसंघात आजवरची विक्रमी अशी म्हणजे ७२,७१५ मते मिळविली. त्यांनी शिवसेनेच्या ईश्वर धोडी यांचा पराभव केला. धोडी यांना ४७,८४३ मते मिळाली होती. घोडा यांचे मताधिक्य २४,८७२ एवढे होते. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मार्क्सवाद्यांनी राजाराम ओझरे या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली. त्यांनी ६२,५३० मते मिळवून राष्ट्रवादीच्या घोडा यांचा पराभव केला. त्यांना ४६,३५० मते मिळाली होती. ओझरे यांचे मताधिक्य १९,१८० एवढे होते.

Web Title: Congress challenge saffron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.