मुंबई -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे. न्यायालयानं राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित केले आहेत, मात्र आरोप अमान्य असल्याचे सांगत राहुल गांधींनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, विचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू, असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सुनावणीनंतर भिवंडी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी या तिन्ही मुद्यांवर नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.
दरम्यान राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत आरएसएसनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या घडवून आणली, असे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात भिवंडी न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. मात्र, राहुल गांधींनी आरोप अमान्य केले आहेत. सुनावणीदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक गहलोत देखील उपस्थित होते.
नेमके काय आहे प्रकरण ?राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वादग्रस्त विधान राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी केले. लोकसभा निवडणूक 2014 च्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका सभेदरम्यान त्यांनी हे विधान केले होते. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
(भाजपा, संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम सुरूय- राहुल गांधी)
भिवंडी येथील दिवंगत काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या पत्नी आणि मुलीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते.
मुंबई विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे केले स्वागत