मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे नवा गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसच्या महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत २० मे रोजी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत निवडलेल्या नावावर राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून गटनेता ठरवला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना केवळ मंत्रालयात बसून मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दुष्काळग्रस्तांना ४ हजार ३०० कोटी रूपयांची मदत दिल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत दिली याची गावनिहाय यादी जाहीर करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. सरकारने वेळकाढूपणा न करता कोरडवाहूला हेक्टरी ५० हजार आणि फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये मदत दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
छावण्यांवर जीएसटी!चारा छावण्याच्या बिलावर सरकार जीएसटी व टीडीएस आकारत आहे. आधीच तुटपुंजे अनुदान, त्यात जीएसटीची कपात होत असल्याने छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे हा कर तातडीने रद्द करावा आणि रोजगार हमी योजनेच्या कामाची बिलं तातडीने द्यावीत, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली.