मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तयारी प्रदेश काँग्रेसने कंबर कसली आहे. मंगळवार आणि बुधवारी प्रदेश काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकीतील पक्षाची रणनितीसह विविध मुद्दयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. इच्छुक उमेदवारांच्या जिल्हावार बैठकीनंतर तिकीट वाटपाबाबत महत्वाचा निर्णय बैठकीत घेतला जाणार माहिती सूत्रांनी दिली आहे.अलीकडेच काँग्रेसने जिल्हास्तरीय इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर निवडणुकीच्यादृष्टीने जाहिरनामा समिती, प्रसिद्धी समिती आणि राजशिष्टाचार समित्यांची घोषणा करण्यात आली. आता विधानसभेतील ठोस रणनितीसाठी मुंबईत दोन दिवसीय संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. महाआघाडीबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात पुकारलेल्या आंदोलनात काँग्रेसने देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत देखील रणनिती ठरविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या प्रसिद्धी आणि सोशल मीडिया समितीची सोमवारी बैठक झाली. मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, समितीचे प्रमुख चरणसिंग सप्रा यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
विधानसभेसाठी काँग्रेस समितीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 5:31 AM