Join us

नाना पटोलेंना कमी बुद्धी म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांवर काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 1:45 PM

काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर देत म्हटले की, "मुळात शहाजी बापू पाटलांची नाना पटोले यांच्यावर बोलण्याची लायकी नाही,

मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गुवाहटी दौऱ्यावरील, काय झाडी, काय डोंगार फेम आमदार शहाजी बापू पाटील या ना त्या कारणाने चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. नाना पटोले हे कमी बुद्धीचे प्रदेशाध्यक्ष असल्याचं शहाजी बापूंनी म्हटलं होतं. आता, काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्यांनी पाटलांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, शहाजी बापू हे तमाशातील तुणतुणं आहे, असं म्हटलंय. 

काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर देत म्हटले की, "मुळात शहाजी बापू पाटलांची नाना पटोले यांच्यावर बोलण्याची लायकी नाही, 'ज्याचं खावं मीठ, त्याला घोडा लावावा नीट' ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आमदार झालेले आज काँग्रेसच्या नेतृत्वावर टिका करत आहेत. ज्या शिवसेनेनी त्यांना तिकीट देत आमदार केल, त्या उद्धव ठाकरेंवर ही हे टिका करतात. ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारी करण्याची शहाजी बापू पाटलांची परंपरा जुनी आहे, आणि ते पुढे पाळत आहेत, असा पलटवार काँग्रेसने केलाय. तसेच, शहाजी बापू पाटलांची अवस्था तमाशामधील तुणतुण्यासारखी झाली आहे. या सरकारमधील ते तुणतुणे आहेत, असे म्हणत काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांवर बोचरी टीका केली.

नाना पटोलेंवर काय केली टीका

नाना पटोले म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी बोचरी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली होती. आता, शहाजी बापूंच्या या टीकेला काँग्रेस नेत्यानं उत्तर देताना जशास तसा टोला लगावला. 

नाना पटोलेंची शहाजी बापूंवर टीका नाना पटोले यांनी शहाजीबापूंच्या काय झाडी, काय डोंगर...या विधानांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर शरसंधान साधले होते. तसेच तुम्हाला काय झाडी, काय डोंगरवाला आमदार आणि असे राज्य सरकार पाहिजे की आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासारखा इमानदार माणूस हवा, असे नानांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी शहाजी बापूंची नक्कलही केली होती. तसेच, गणपतराव देशमुखांची आठवण काढत, त्यांच्यासारखा माणूस होणे नाही, असेही नानांनी सांगोल्यात म्हटले होते. 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेआमदारशिवसेना