कॉंग्रेसने धारावीकरांची फसवणूक केली - प्रियंका चतुर्वेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:26 PM2019-10-17T22:26:49+5:302019-10-17T22:27:09+5:30
पस्तीस , चाळीस वर्षांपासून कॉंग्रेसने धारावीची दुरवस्था केली.
मुंबई : पस्तीस , चाळीस वर्षांपासून कॉंग्रेसने धारावीची दुरवस्था केली. कॉंग्रेसच्या आमदार, खासदारांनी धारावीचा विकास केला नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. धारावीकरांनी इतकी वर्षे कॉंग्रेसला संधी दिली. आता एक संधी शिवसेनेला द्यावी, धारावीकरांच्या आयुष्यातील विकासाच्या नवीन पर्वाला आम्ही प्रारंभ करू, अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या व राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली.
कॉंग्रेसने चाळीस वर्षे धारावीकरांंचा विश्वासघात केला मात्र आम्ही विकास करु. आतापर्यंत विकासाच्या नावावर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळाले. कॉंग्रेसने विकासाची केवळ घोषणाबाजी केली. धारावी पुनर्विकासाच्या नावावर कॉंग्रेसकडून केवळ फसवणूक झाली. धारावीकरांनी सर्वांच्या घरात दिवे पोहोचवले आम्ही आता धारावीकरांच्या जीवनात प्रकाश आणणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धारावीला दिल्लीप्रमाणे बनवणार व नंतर दुबई प्रमाणे विकसित करणार असे त्या म्हणाल्या. धारावीला भ्रष्टाचार मुक्त करुन विकास साधण्याची गरज आहे. आम्हाला संधी दिल्यास पाच वर्षात धारावीचे चित्र बदलण्याची ग्वाही त्यांनी दिली. धारावीच्या गरिबीवर
त्यांनी राजकारण केले. गरिबीचे पर्यटन करुन चित्रपटाच्या माध्यमातून पैसा कमावला गेला मात्र ही गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाहीत, ही नामुष्की आहे. धारावीत पायाभूत विकासकामे करण्यास आम्ही प्राधान्य देणार असे आश्वासन त्यांनी दिले. आदित्य व उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नाप्रमाणे धारावीचा विकास करण्यास शिवसेना कटिबद्ध आहे, त्यासाठी धारावीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
धारावीचे शिवसेनेचे उमेदवार आशिष मोरे यांच्या प्रेमनगर येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी आशिष मोरे, माजी आमदार बाबूराव माने, माजी महापौर श्रध्दा जाधव, नगरसेविका हर्षला मोरे, शिवसेनेचे या मतदारसंघाचे प्रचार समन्वयक साईनाथ दुर्गे, मनोहर रायबागे, आनंद दुबे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
आशिष मोरे म्हणाले, गायकवाड कुटुंबीयांनी धारावीत विकासकामे केली नाही. मी स्थानिक उमेदवार असून नेहमी धारावीत राहतो त्यामुळे हक्काने कामे करुन घेता येतील, तुम्ही एक संधी द्या तुमचा विश्वास वाया जाऊ देणार नाही. बाबूराव माने म्हणाले, धारावी पुनर्विकासाचे काम निवडणुकीनंतर सुरु होणार आहे. कॉंग्रेसच्या आृमदार, खासदारांनी धारावीला विकासापासून वंचित ठेवले आहे. धारावीला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. श्रध्दा जाधव म्हणाल्या, धारावीला नवीन ओळख देण्यासाठी शिवसेनेला विजयी करण्याची गरज आहे.