काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:33 AM2020-12-22T04:33:28+5:302020-12-22T04:33:57+5:30

Congress : मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सांगितले.

Congress delegation meets Uddhav Thackeray! | काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट!

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट!

Next

मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे सोपवले.

सोनिया गांधी यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सूचना रास्त असून सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाज घटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सांगितले.

थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री चंद्रकात हंडोरे, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. दलित व मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक काँग्रेस पक्षाने आयोजित केली होती. या बैठकीत काही मुद्दे चर्चेत आले होते त्यासंदर्भात सोनिया गांधी यांनी पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत.

आमचे आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमानुसार काम करत आहे. आमच्यातील एकी भाजपला बघवत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस विधाने करत आहेत. येत्या काळात भाजप सोडून कोण कोण महाविकास आघाडीत येते हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल असे सांगून थोरात पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष नेहमीच दलित, आदिवासी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कट्टिबद्ध आहे. या समाज घटकांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमी कार्यरत राहिला आहे. 

Web Title: Congress delegation meets Uddhav Thackeray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.