मुंबई : मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता पोलीस स्थानकात पोहचला आहे. भाजप आ. अमित साटम आणि भाजपने दुटप्पीपणा करत मुंबईत गदारोळ करून जनतेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी केला. साटम यांनी प्रस्तावाची प्रत खोटी असल्याचा केलेला दावा खोडून काढतानाच जगताप यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून अमित साटम यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
मुंबई पक्ष कार्यालयात लिगल सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, मालाड पश्चिम येथील एका मैदानाला पालकमंत्री आ. अस्लम शेख यांनी टिपू सुलतान यांचे नाव दिले. भाजपने त्याला विरोध करत आंदोलन केले. तर एम पूर्व विभागातील एका रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी मांडला. २३ डिसेंबर २०१३ साली महापालिकेच्या सभेमध्ये तो प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास सूचक म्हणून यशोधर फणसे आणि अनुमोदक म्हणून भाजपचे आताचे आमदार व त्यावेळचे नगरसेवक अमित साटम होते. त्याची अधिकृत व प्रमाणित प्रतदेखील उपलब्ध आहे. ही वस्तुस्थिती असतानाही अमित साटम यांनी ती प्रत खोटी असल्याचे सांगून, मुंबई महापालिकेची व काँग्रेसची बदनामी केली. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप-शिवसेनेच्या भांडणात काँग्रेसची अनाठायी धडपड - साटम
भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्षात काँग्रेसला कोणतेच स्थान नाही. मुंबईच्या राजकारणातील स्थान गमावल्यामुळेच या वादात उडी घेऊन आपले स्थान शोधण्याची अनाठायी धडपड काँग्रेसकडून सुरू आहे. पालिकेच्या कामकाजातील जी कागदपत्रे व्हायरल करण्यात आली, ती बनावट होती. मूळ कागदपत्रात खाडाखोड करून माझे नाव त्यात लिहिण्यात आले, शिवाय नव्याने कागदपत्रे तयार करत त्यात माझे आणि अन्य भाजप नगरसेवकांची नावे घुसविण्यात आली. हा सारा प्रकार मी तीन दिवसापूर्वीच उघडकीस आणला आहे. शिवाय, पालिकेचे प्रस्ताव म्हणून जे बनावट नमुने व्हायरल करण्यात आले त्याबद्दल मी फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला आहे, असे अमित साटम यांनी सांगितले.