Join us

सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 3:43 AM

भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मुंबई /दिल्ली : एकीकडे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी व्हायला हवे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यासाठी राजी नाहीत. अशावेळी फार तर शिवसेना- राष्ट्रवादीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस घेऊ शकते.मुंबई, दिल्लीतील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही परिस्थिती स्पष्ट केली. काँग्रेसचे बहुसंख्य आमदार हे आपल्या पक्षाने शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सहभागी व्हावे या मताचे आहेत. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा त्यास विरोध आहे. हिंदुत्वासह विविध मुद्यांवर शिवसेनेची असलेली भूमिका काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत अशीच राहिली आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये बसले तरी किंवा बाहेरून पाठिंबा दिला तरी काँग्रेसला ते राजकीयदृष्ट्या परवडणार नाही, असा सूर दिल्लीत आहे.शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आपणही सरकारमध्ये सहभाग सहभागी व्हावे ही भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसच्या काही आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट मागितली होती; मात्र ती मिळाली नाही. राष्ट्रवादीकडून फारच आग्रह धरला गेला तर काँग्रेस एखादवेळी सेना-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करू शकेल,पण तूर्त तोही विचार फक्त समोर नाही. काँग्रेस सत्तेत सहभागी झाली नाही तर सरकारला स्थैर्य असणार नाही; किंबहुना सरकार सहा आठ महिन्यांच्या वर टिकणार नाही असे राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांना वाटते. याआधी काही राज्यांमध्ये तसा अनुभव देखील आलेला आहे.भाजप-शिवसेनेत मनोमिलनाचे प्रयत्न भाजप व शिवसेनेत निर्माण झालेले टोकाचे मतभेद आणि त्यामुळे या दोघांना दोन पक्षांचे सरकार स्थापन करण्यासंदर्भात निर्माण झालेले प्रश्नचिन्ह या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पातळ्यांवर दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन पुढील रणनीती संदर्भात चर्चा करणार आहेत.>राष्ट्रवादीकडून अद्याप सेनेला ठोस आश्वासन नाहीसरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीशी चर्चा सुरू ठेवली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत. मात्र विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, ही चर्चा सरकार स्थापण्याच्या दृष्टीने फलदायी होऊ शकलेली नाही. सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादीकडून ठोस आश्वासन अद्याप सेनेला मिळालेले नाही. राष्ट्रवादी विरोधी पक्षातच बसेल असे पवार सांगत आहेत. तथापि राऊत हे सतत पवार यांच्या भेटीला जात असल्याने त्याचा फायदा भाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेला नक्कीच होत आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाशरद पवारउद्धव ठाकरे