Join us

काँग्रेसमुळे रखडला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 6:51 AM

यादी तयार नाही; मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण दिल्लीत दाखल

मुंबई : नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप काँग्रेसच्या यादीला दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाला नसल्याने विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात भेट झाली झाली होती. त्यावेळी अधिवेशनानंतर दोन दिवसात विस्तार होईल, असे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले होते.

काँग्रेसमधून कोणाला मंत्रीपद द्यायचे याची नावे ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. सोमवारी यादी फायनल करुन येतो, मंगळवारी शपथविधी करु असे थोरात यांनी सांगितले होते; मात्र काँग्रेसची नावे अंतिम झाली नाहीत. त्यामुळे मंगळवारी शपथविधी होणार नाही असे राष्टÑावदीने आपल्या आमदारांना दुपारीच कळवून टाकले होते. सायंकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. यावेळी प्रफुल्ल पटेल, अजित पवार देखील हजर होते. २५ किंवा २६ डिसेंबर रोजी अमावस्या असल्याने या तारखेला शपथविधी करण्यास काही नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे २७ किंवा ३० तारखेला विस्तार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळी ४-३० वाजता शपथविधी होईल असे शिवसेनेकडून सांगितले जात होते. पण राजभवनावर तशी कोणतीही माहिती सायंकाळपर्यंत दिली गेली नव्हती.

शिवसेना आणि राष्टÑवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार आहे. जर काँग्रेसकडून फारच उशिर होऊ लागला तर शिवसेना आणि राष्टÑवादीच्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात घ्यायचे की नाही यावरुन खल चालू आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अशोक चव्हाण यांना मंत्रीमंडळात व पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा एक प्रस्ताव सोमवारी पुढे आला आहे.

थोरात पक्षश्रेष्ठींना भेटलेकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते व खासदार अहमद पटेल, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची थोरात यांनी भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा झाल्याचे समजते.महाराष्ट्रातील विविध प्रदेश व जातीय समीकरण लक्षात घेऊन मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते. या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता जवळपास नसल्याचे सुत्रांनी सांगितले. याशिवाय के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांच्या नावांची चर्चा आहे.मंत्रिपदाबाबत माहिती नाही - चव्हाणया संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नावाबद्दल मी ऐकतो आहे. माझ्या नावाबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. राजघाटवर सत्याग्रहात सामील होण्यासाठी आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेसबाळासाहेब थोरातमहाराष्ट्र सरकार