Join us

राज्यात काँग्रेस अडचणीत ? जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:59 PM

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची घोषणा केली नाही. काही जागांवर वरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकमत नसल्याने आघाडीचा प्रचार थंड पडल्याचे दिसून येते. 

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाने युती जाहीर करुन दोन्ही पक्षाच्या संयुक्त कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार सुरु ठेवलंय, मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची घोषणा केली नाही. काही जागांवर वरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकमत नसल्याने आघाडीचा प्रचार थंड पडल्याचे दिसून येते. 

1 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून धुळे आणि मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र अजूनही पक्ष नेतृत्वाला काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला चाप लावण्यात यश आले नाही. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून काँग्रेस 25 जागांवर तर राष्ट्रवादी 23 जागांवर निवडणुका लढणार आहेत..राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील एक जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर आणखी एक जागा काँग्रेसने सोडावी अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आली आहे. वर्धा किंवा सांगली या दोन्ही पैकी एक लोकसभा मतदारसंघ काँग्रेस राजू शेट्टी यांच्यासाठी सोडू शकतो मात्र त्यावर स्पष्ट निर्णय काँग्रेस नेतृत्वाकडून घेतला नाही. 

देशात राहुल गांधी, प्रियंका गांधी आक्रमकरित्या भारतीय जनता पार्टीविरोधात निवडणुकीच्या रणांगणात उतरले असताना दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक धोरण, अंतर्गत गटबाजी आणि युवा तसेच नवीन मतदारांशी संपर्काचा अभाव त्याचसोबत पक्ष नेतृत्व आणि ग्रामीण स्तरावरील कार्यकर्त्यामध्ये असलेली दुरी याचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला आगामी निवडणुकीमध्ये सहन करावा लागू शकतो. 

काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आपापल्या लोकसभा मतदारसंघाबाबत चिंतेत आहे त्यामुळे राज्यामध्ये इतर ठिकाणी लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या उस्मानाबाद आणि रावेर मतदारसंघावर दावा केला आहे. उस्मानाबाद येथून काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे इच्छुक असल्याचं कळतंय. तर काँग्रेसकडे असणाऱ्या औरंगाबाद आणि अमरावती येथील जागांवर राष्ट्रवादीने दावा केलेला आहे.   

काँगेसमधील एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले की, जागा वाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील तीन महिन्यांपासून बैठका सुरु आहेत, मात्र पक्ष नेतृत्वाकडून कोणताही ठोस निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक होईल त्यानंतर यावर तोडगा निघेल असं सूत्रांनी सांगितलं.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसनिवडणूक