काँग्रेस उतरली रस्त्यावर
By admin | Published: February 10, 2015 12:38 AM2015-02-10T00:38:48+5:302015-02-10T00:38:48+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकांत लोकांना भुलविणारी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा -शिवसेना सरकारने घेतलेल्या
ठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत लोकांना भुलविणारी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा -शिवसेना सरकारने घेतलेल्या जनहितविरोधी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी तीनहात नाक्यावर रास्ता रोको केला. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या हाय वेवरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. या वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ४५ जणांना ताब्यात घेतले होते.
नैसर्गिक संकटांनी महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केंद्र व राज्य सरकारने भरीव मदत दिली नाही. हेक्टरी ४५०० रुपये मदत जाहीर करतानाही २ हेक्टरपर्यंत मर्यादा घालून व त्यापेक्षा नाममात्र अधिक शेती असणाऱ्यांना १ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा बनवाबनवीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन पाळण्यास सरकारचा नकार, डिझेल व पेट्रोलचे दर नियमानुसार ५० टक्के कमी न करता केंद्र सरकारने जनतेची लूट चालविली आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला भूमी अधिग्रहण कायदा, उद्योगपतींच्या फायद्यासाठी कामगारांना देशोधडीला लावणारा निर्णय, अन्नसुरक्षा अंशदानाला कात्री लावल्याने राज्यातील १ कोटी ७७ लाख गरिबांची उपसमार, घरगुती वीज, छोटे उद्योग, पॉवरलूम यांच्या सवलतीत कपात करून जनतेवर भुर्दंड बसविला. कमीतकमी ठाण्याच्या वाहनांचा टोल बंद करावा आणि रेती उत्खनन करणाऱ्यांवर उपासमारीचे संकट दूर करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केल्याची काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांनी सांगितले. या आंदोलनासाठी सकाळपासूनच पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.