स्थायी समितीसाठी सेनेचा काँग्रेसला ‘हात’
By admin | Published: March 18, 2017 02:32 AM2017-03-18T02:32:16+5:302017-03-18T02:32:16+5:30
एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पारदर्शक
ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराचा कांगावा करणाऱ्या भाजपाला पहारेकऱ्याच्या भूमिकेत ठेवून शिवसेनेने काँग्रेसबरोबर हातमिळवणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे केवळ तीन नगरसेवक निवडून आल्यानंतरही काँग्रेसला आता स्थायी समितीत स्थान देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेची प्रथमच एकहाती सत्ता संपादित करून शिवसेनेने नवा इतिहास घडवला आहे. परंतु, तरीदेखील स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. मात्र, ८ सदस्य शिवसेनेचे गेल्यास विरोधी बाकावर असलेले राष्ट्रवादी, भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी धरून शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु, मागील वेळेस ज्या पद्धतीने आठ-आठ सदस्य असताना लॉटरी पद्धतीने स्थायी सभापतीपद लोकशाही आघाडीच्या वाट्याला गेले होते, तसे आता होऊ नये, म्हणूनच शिवसेनेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, स्थायीची समीकरणे जुळवण्यासाठी त्यांनी काँग्रेसबरोबर चर्चा सुरू केली आहे. तसेच दोन अपक्षांशीदेखील चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यांना बरोबर घेतल्यास शिवसेनेचे आठ आणि एक काँग्रेसचा असे समीकरण तयार होऊन आपसूक स्थायीच्या चाव्या शिवसेनेच्या हाती येणार आहेत. किंबहुना, आता स्थायीमध्ये टाळी देण्याच्या बदल्यात शिवसेनेच्या तीन स्वीकृत सदस्यांमध्ये काँग्रेसच्या एका सदस्याचादेखील नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवघे तीन नगरसेवक निवडून आल्यानंतरदेखील काँग्रेसला एकाच वेळेस स्थायी आणि स्वीकृतपदाची लॉटरी लागण्याची शक्यता सध्या सुरू असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील चर्चेतून समोर येऊ लागली आहे. त्यामुळे आता स्थायीचा घोडेबाजार मात्र गरम झाला असून, काँग्रेस शिवसेनेला टाळी देणार काय, हे महत्त्वाचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)
भाजपा राहणार पहारेकऱ्याच्या भूमिकेत
स्थायीची समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेना आपल्याला टाळी मागेल, अशी आशा भाजपाला होती. परंतु, भाजपाला टाळी न देता शिवसेनेने काँग्रेसला टाळी देण्यासाठी हात पुढे केल्याने भाजपाला आता पारदर्शकतेचा पहारेकरी म्हणूनच महापालिकेत वावरावे लागणार असल्याचे दिसते.
राष्ट्रवादीबरोबर निवडणुकीपूर्वी असलेली आघाडी निवडणुकीनंतर काँग्रेसने तोडली असून, त्यांनी आपला वेगळा गट निर्माण केला आहे. सत्तेतील शिवसेनेबरोबर जाऊन काही पदे मिळण्याची शक्यता आहे. परंतु, राष्ट्रवादीबरोबर राहिल्यास तेदेखील मिळणे शक्य नसल्याची खात्री काँग्रेसला आहे. त्यामुळे ते आता सत्ताधारी शिवसेनेला स्थायीची टाळी देणार असल्याचे बोलले जात आहे.
सभापतीच्या रेसमधले...
स्थायी समितीची समीकरणे जुळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेतील नेतेमंडळी व्यस्त असताना स्थायी समिती सभापतीपदासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यामध्ये राम रेपाळे, संतोष वडवले, अशोक वैती आणि संजय भोईर या चौघांची नावे आता आघाडीवर आली आहेत. त्यामुळे पक्ष यातील कोणाला न्याय देणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.