Join us

“लूट थांबवा, पेट्रोलचा दर ५१ रुपये तर डिझेलचा ४१ रुपये प्रति लीटर करा”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:17 IST

Congress Harshwardhan Sapkal News: सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Congress Harshwardhan Sapkal News: जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आकडेवारीसह पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी करता येऊ शकतात, हे स्पष्ट केले. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल ७० रुपये लिटर तर डिझेल ४५ रुपये लिटर होते. मग आता तर क्रूड ऑईल ६५ डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत. युपीए सरकार असताना पेट्रोलवर ९.५६ रुपये तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर (एक्साईज टॅक्स) होता, तो भाजपा सरकारने वाढवत ३२ रुपयांपर्यंत केला, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी

काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना एक्साईज टॅक्समध्ये आणखी २ रुपयांची वाढ झाली. १ रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता १८ टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे, यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. एलपीजी सिलिंडरसुद्धा ४०० ते ४५० रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलींडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे, ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

दरम्यान, रशिया भारताला बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दराने क्रूड ऑईल देते, त्याचा थेट फायदा हा रिलायन्स व नायरा या दोन कंपन्यांना होतो. ह्या दोन कंपन्या सरकारच्या लाडक्या आहेत का? क्रूड ऑईलच्या किमती कमी होत असताना त्याचा फायदा जनतेला न होता ऑईल कपन्यांना होत आहे. स्वस्त क्रूड ऑईल घेऊन या कंपन्या युरोपमध्ये विकून नफेखोरी करत आहेत. सर्वसामान्यांना याचा फायदा होण्यापेक्षा सरकार मोठ्या उद्योगपतींना लाभ देत आहे. युपीए सरकार असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले तर ट्विट करणारे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारखे सेलिब्रिटी आणि बाबा रामदेव सारखे स्वयंघोषित संत आता पेट्रोल १०९ रुपयांवर असतानाही गप्प आहेत. तर एलपीजी सिलिंडर १५ रुपयांनी वाढले तर रस्त्यावर उतरणारे आता कोठे गायब झाले? असा प्रश्न करत हा तेलाचा हा जो काळा खेळ सुरु आहे, त्यावर सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली.

 

 

टॅग्स :काँग्रेसहर्षवर्धन सपकाळइंधन दरवाढकेंद्र सरकार