राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने अजूनही नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली नव्हती. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या, अखेर आज काँग्रेसने काँग्रेसच्या सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केले आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणूक; भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नाशिकच्या उमेदवारीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या, विधान परिषदेसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून डॉ. सुधीर बी. तांबे यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्यता दिली आहे, या संदर्भातील पत्र काँग्रेसने प्रसिद्ध केले.
भाजपनेही उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत. कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून रणजीत पाटील यांना तर मराठवाडा शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे.
नाशिक विभागासाठी भाजपने अजुनही उमेदवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे भाजपकडून कोणाची उमेदवारी जाहीर होते यावरुन चर्चा सुरू आहेत.
भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेब) व रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा अखेरचा दिवस आहे.