देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकांच्या आधी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकी साठी चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजस्थानमधून, अखिलेश प्रसाद सिंग यांना बिहारमधून, अभिषेक मनू सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून, तर चंद्रकांत हंडोरे यांनी महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे.
भाजपनेही राज्यसभेसाठी यादी जाहीर केली
भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली असून त्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने बुधवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना ओडिशा आणि मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केले. हे दोघेही निवडून आले तर या दोन्ही राज्यांतील नेत्यांची ही दुसरी राज्यसभेची टर्म असेल हे जवळपास निश्चित आहे.
केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्याशिवाय भाजपने मध्य प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आणखी तीन नावांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नरोलिया आणि बन्सीलाल गुर्जर हे मध्य प्रदेशमधून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसला महाराष्ट्रात धक्का
तर दुसरीकडे, महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेची उमेदवार देऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.