लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वारंवार होणाऱ्या भेटीमुळे काँग्रेस पक्षही सावध झाला असून राज्यातील या घडामोडींवर काँग्रेस हायकमांड लक्ष ठेवून असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे, त्यांचे नातेवाईक आहेत तर घरी भेट घेता येते, पण झोपून गाडीत जाणे व गुप्तपणे बैठक घेणे कशासाठी, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत चर्चा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याबरोबरही चर्चा झाली असून त्यांना याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल, असेही पटोले यांनी सांगितले.