Join us

"काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत, जागावाटपाची चर्चा दिल्लीतच होणार", संजय राऊत यांनी सुनावले  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:19 AM

Sanjay Raut News: सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल या काँग्रेसमधील निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आम्ही किती जागा लढू, तुम्ही किती जागा लढणार, याचा निर्णय़ हा दिल्लीमध्ये होईल.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चैबांधणी सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने संजय राऊत यांनी २३ जागांवर दावा ठोकला होता. तर तुम्ही एवढ्या जागा लढवल्या तर आम्ही कुठून लढायचं, असा प्रश्न काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विचारला होता. त्यावरून आता संजय राऊत यांनी निरुपम यांना चांगलेच सुनावले आहे. तसेच काँग्रेसचे हायकमांड हे दिल्लीत असतात. त्यामुळे जागावाटपाची चर्चा ही दिल्लीतच होईल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या चर्चांबाबत संजय राऊत म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल या काँग्रेसमधील निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आम्ही किती जागा लढू, तुम्ही किती जागा लढणार, याचा निर्णय़ हा दिल्लीमध्ये होईल. येथील गल्लीबोळातील कुणी राष्ट्रीय पातळीवरचं बोलणार असेल, तर त्याचं कोण ऐकणार. आम्ही महाराष्ट्रामध्ये नेहमी २३ जागा लढत आलो आहोत. त्याबरोबरच दादरा नगर हवेलीचा एक जागा ह्या जागा आम्ही आमच्याकडे कायम ठेवणार आहोत. आम्ही एवढंच म्हटलंय. तसेच आम्ही पहिल्यांदा बैठक घेतली होती तेव्हा जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करायची, असं ठरलं होतं. यात काँग्रेस येत नाही. कारण काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकलेली नव्हती. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात शुन्यापासून सुरुवात करायची आहे. मात्र काँग्रेस हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील एक महत्त्वपूर्ण सहकारी आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन काम करणार आहोत. त्यामुळे बाकी कुणी काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

बाकी जागावाटपावरून टीका करणारे संजय निरुपम हे कोण आहेत. जागावाटपाचा अधिकार त्यांना आहे का? काँग्रेससोबत आमची जी चर्चा सुरू आहे ती दिल्लीत सुरू आहे. काँग्रेसचे हायकमांड हे दिल्लीत असतात. त्यामुळे आम्ही दिल्लीत बोलू. बाकी जागावाटपाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही २३ जागांबाबत आजच पहिल्यांदा बोललेलो नाही. मागच्या निवडणुकीत आम्ही २३ जागांवर लढलो होतो. त्यातील १८ जागा जिंकल्या होता. तर छ. संभाजीनगरची जागा थोडक्यात गेली होती. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय. काँग्रेसने जागा जिंकल्याच नव्हत्या. मात्र जिथे काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसची मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच आहे. त्याबाबत काँग्रेसचे दिल्लीतले हायकमांड आणि आमचं एकमत झालेलं आहे. त्यामुळे मुंबईतलं कुणी काही बोलत असेल तर त्यांच्याकडे काही गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी संजय निरुपम यांना लगावला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात उत्तम संवाद आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यातही चांगला संवाद आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत काय करायचं ते आम्ही पाहू, असेही संजय राऊत यांनी सांगितले.  

टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडीकाँग्रेससंजय निरुपम