मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर आयोजित करण्याची तयारी मुंबईकाँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस करत असताना राज्य सरकारने अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे परवानगीसाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.या सभेच्या निमित्ताने राहुल गांधी हे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या राजवटीवरही ते शाब्दिक हल्ले करतील. राजस्थानमधील रॅलीनंतर मुंबईची सभा यशस्वी करण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना विचारले असता, त्यांनी २८ डिसेंबरच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठी मुंबई महापालिका व राज्य सरकारकडे आवश्यक परवानग्या मागितलेल्या आहेत, मात्र अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.