काँग्रेसने उत्तर भारतीयांना सन्मान दिला - भाई जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:06 AM2021-03-25T04:06:25+5:302021-03-25T04:06:25+5:30
मुंबई : रोजी-रोटीच्या शोधात उत्तर भारतीय समाज नेहमीच स्थलांतर करीत राहिला आहे. हा समाज जिथे राहतो त्या भूमीला आपली ...
मुंबई : रोजी-रोटीच्या शोधात उत्तर भारतीय समाज नेहमीच स्थलांतर करीत राहिला आहे. हा समाज जिथे राहतो त्या भूमीला आपली कर्मभूमी मानून, त्या भूमीशी एकरूप होतो. पण, जितका सन्मान उत्तर भारतीय समाजाला काँग्रेसकडून महाराष्ट्रात मिळाला, तेवढा सन्मान क्वचितच दुसऱ्या राज्यात मिळाला असेल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.
मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी भाई जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, उपाध्यक्ष शिवजी सिंह, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव जेनेट डिसुझा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांच्यासह उत्तर भारतीय सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी जगताप म्हणाले, उत्तर भारताशी महाराष्ट्राचा संबंध खूप पूर्वीपासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट हे उत्तर प्रदेशचे होते. काँग्रेसने महाराष्ट्रातील राजकारणातही उत्तर भारतीयांना स्थान दिले. महाराष्ट्रात जितकी उत्तर भारतीयांची संख्या आहे, तेवढी कोणत्याही राज्यात नाही. महाराष्ट्रात काही जण जातीधर्माचे राजकारण करतात; पण काँग्रेसने ते केले नाही, असे जगताप म्हणाले.
या वेळी चरणसिंग सप्रा म्हणाले की, कोविड काळात पक्षाच्या उत्तर भारतीय सेलने केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. आज आपल्याला रस्त्यावर उतरून हिरिरीने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण शेवटी मुंबई ही आपली मातृभूमी व कर्मभूमी आहे. तिच्यासाठी आपल्याला लढायचे आहे व आगामी महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवायचे आहे. या वेळी जगताप यांनी उत्तर भारतीय सेलच्या कामांचा जिल्हानिहाय आढावा घेतला.