Join us

नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू

By मनोहर कुंभेजकर | Published: April 29, 2024 5:50 PM

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत.

मुंबई - काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर नसीम खान यांनी अल्पसंख्याकांना काँग्रेस डावलत असल्याचा आरोप करत पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून ही राजीनामा दिला. उत्तर मध्य मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते.

नसीम खान यांच्या बांद्रा येथील कार्यालयात आणि कुर्ला येथील निवासस्थानी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले होते.त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, महाराष्ट्र प्रदेश कोशाध्यक्ष अमरजीत सिंग मन्हास, मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी नसीम खान यांच्याशी बिकेसी येथील एम.सी.ए येथे बैठकीत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. खासदार मिलिंद देवरा, मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम आणि खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यावर नसीम खान हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.त्यांना मानणारा मोठा अल्पसंख्यांक वर्ग असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्यास काँग्रेस साठी हा मोठा झटका असेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत नसीम खान चांदिवली विधानसभा मतदार संघातून फक्त 400 मतांनी हरले होते आणि शिंदे सेनेचे आमदार दिलीप लांडे विजयी झाले होते.

टॅग्स :मुंबईकाँग्रेसनसीम खान