मुंबई :
गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर जी २३ गटातील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचीही नाराजी समोर आली आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे मुघल सल्तनत आहे का?, गांधी परिवाराने तुम्हाला पदे दिली, तुम्ही खूश झाले पाहिजे. काँग्रेस पक्ष वैयक्तिक मालकीचा नाही, हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे, त्याची एक घटना आहे. हा पक्ष घटनेप्रमाणे चालला पाहिजे. मागील २४ वर्षात लोकशाही पद्धतीच्या निवडणुका झाल्या नाहीत. याचा कुठेतरी गांभीर्यान विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
पक्षात मनाने निर्णय घेत आहात, एका कुटुंबातील जास्त पक्षात नको, स्वतः राहुल गांधी कुठल्या कुटुंबातील आहेत, असा थेट सवालही चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाला वाचवायचे असेल तर लोकशाही पद्धतीने सगळी पदे भरली पाहिजेत.
विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना मतदान न करता पैसे घेऊन भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या ७ आमदारांवर कारवाई होत नसेल तर काय बोलणार असा धक्कादायक दावाही चव्हाण यांनी केला आहे.