मुंबई: विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला. विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटाने बहुमत जिंकले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मते मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी आपले मत देताना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने १६४ जणांनी मतदान केल्यानंतर विरोधकांनी मतदान केले. यावेळी काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी आपला क्रमांक आल्यावर एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली. याआधी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी झालेल्या मतदानावेळीही शायरीतून गोरंटयाल यांनी टोला लगावला होता.
आजकल ईडी, इन्कम टॅक्स, राज्यपाल जरूरी हैं
आपला क्रमांक आल्यावर, शेरो-शायरी केली, तर मला ईडी लागेल. राजकारणात साम, दाम, दंड, भेद असे प्रकार चालतात. मात्र, आजकाल ईडी, इन्कम टॅक्स, राज्यपाल गरजेचे झाले आहे. अबतक ५६, असे म्हणत कैलास गोरंटयाल यांनी विरोधात मतदान केले. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना केवळ मतदानापुरते बोलावे. मतदान करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. पण शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत राहुल नार्वेकर यांना मतदान केले. आवाजी मतदानाने निर्णय घेता न आल्याने शिरगणती झाली. यावेळी जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलास किसन गोरंटयाल यांनी शायरी म्हणत शिंदे गटाला टोला लगावला. "ऐसे वैसे कैसे कैसे हो गये, कैसे कैसे ऐसे वैसे हो गये" अशा शब्दांत शायरीतून त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.