मुंबई : माजी खासदार आणि काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकचे माजी खासदार डॉ. दिवंगत वसंत पवार यांच्या कन्या अमृता, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे संग्राम, लातूरचे माजी आमदार धर्माजी सोनकवडे आदींनी त्यांच्या समर्थकांसह मंगळवारी येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. डॉ. सुभाष भामरे आदींच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात प्रवेश कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आ. हरीश पिंपळे, आ. तान्हाजी मुटकुळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संजय केणेकर, विजय चौधरी, मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे माजी पुणे शहरप्रमुख व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्याम देशपांडे, शाहीर परिषदेचे मनोहर महाराज धांडग यांनीही प्रवेश केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"