अती तिथे मातीच! अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाण
By कुणाल गवाणकर | Published: November 9, 2020 05:53 PM2020-11-09T17:53:01+5:302020-11-09T17:54:00+5:30
arnab goswami: अशोक चव्हाण यांची रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका
मुंबई: रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट संघर्ष सुरू आहे. गोस्वामी यांच्या सुटकेसाठी भाजप आक्रमक झाला असताना आता महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी अर्णब यांच्यावर टीका केली आहे. अर्णबने ज्या पद्धतीने इतरांना वागवलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी एकही व्यक्ती नाही. अती तिथे माती होणारच, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गोस्वामींवर टीका केली.
'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अशोक चव्हाण उपस्थित आहेत. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. त्यावेळी लोकमतशी बोलताना चव्हाण यांनी अर्णब गोस्वामींवर टीकास्त्र सोडलं. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. गोस्वामींसह तिघांनी आपले पैसे थकवल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत लिहून नाईक यांनी २०१८ मध्ये आत्महत्या केली. मात्र या प्रकरणाची फाईल फडणवीस सरकारनं बंद केली. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. 'आधीच्या सरकारनं गोस्वामींना पाठीशी घातलं का, हा चौकशीचा भाग आहे,' असं चव्हाण म्हणाले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीक केली. 'राज्य सरकारनं शहाणं व्हावं. जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही. पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे, तर नीट काम करावं. कुणी काही बोलतंय त्यावर रिऍक्ट करून त्रास देणं बंद करावं,' असं अमृता म्हणाल्या. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.