Join us  

"महाराष्ट्रात आज जे गलिच्छ राजकारण सुरूये त्याला जनता खपवून घेणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 8:23 PM

आपण तिघं एकत्र येऊन सिंगल इंजिन सरकार चांगलं काम करेल हे महापालिकेत दाखवून देऊ, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य.

“आपण एकत्र राहणार आहोत म्हणून ही सभा. बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. निकाल पाहिले तर महाविकास आघाडी एकत्र आल्यावर महाराष्ट्राचं भविष्य आणि विकास आपण घडवू शकतो हे दाखवून दिलं. शेतकऱ्यांनी अडचणीच्या परिस्थितीतही कौल महाविकास आघाडीच्या बाजूनं दिला. आपण हॅटट्रिक साधली. विधानपरिषेदेचे निकाल, अंधेरीची पोटनिवडणूक चांगली झाली, बाजार समिती पाहिली तर ही हॅटट्रिक आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला हॅटट्रिक नाही, विजयाचा षटकार मारायचाय,” असा विश्वास काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित वज्रमूठ सभेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

“राज्यातील महापालिकेतदेखील विजय मिळवणार आहोत म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे. महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, लोकसभा, विधानसभा याची जबाबदारी आपल्यावर आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण १०० टक्के लढणार आहोत. लोक आयाराम गयारामांना जवळ करण्याच्या इच्छेत नाही. महाराष्ट्रात आज जे गलिच्छ राजकारण सुरूये त्याला महाराष्ट्राची जनता खपवून घेणार नाही. आगामी काळात संधीसाधू, आयाराम गयारामांचं सरकार आणू द्यायचं नाही. एकत्र राहिलो तर १०० टक्के सरकार आणू शकतो हे गेल्या निकालांनी दाखवून दिलंय,” असं अशोक चव्हाण म्हणाले.

१०० टक्के यश मिळेलयादरम्यान त्यांनी दीवार चित्रपटातील एक डायलॉग देखील सांगितलं. तसंच आपल्याकडे लोकांचं समर्थन आहे, उद्धव ठाकरे आहेत, अजित पवार आणि नाना पटोलेही आहेत. या सर्वांची शक्ती पाहिली तर येणाऱ्या काळात १०० टक्के यश मिळणार असल्याचंही ते म्हणाले. लोकं सत्यासोबत आहेत. लोकांना आयाराम गयारामांचं सरकार आणू द्यायचं नाही हे स्पष्ट आहे. हे म्हणतात डबल इंजिन सरकार, महापालिकेत म्हणतील ट्रिपल इंजिन पाहिजे, या तीन इंजिनची गरज काय? आपलं इंजिन ताकदवान आहे. ज्यांचं इंजिन कमकुवत आहे त्यांना जास्त इंजिनची गरज आहे. आपण तिघं एकत्र येऊन सिंगल इंजिन सरकार चांगलं काम करेल हे महापालिकेत दाखवून देऊ. ट्रिपल इंजिन कोणत्या दिशेला जाईल हे सांगू शकत नसल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :काँग्रेसअशोक चव्हाण