मुंबई - बीड येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीवर भाष्य करताना केलेल्या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी इशारा दिला आहे.
अशोक चव्हाणांनी ट्विट करुन म्हटलंय की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल असं त्यांनी बजावलं आहे.
बीडच्या संविधान बचाव कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की,तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला. मात्र आव्हाडांवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
इंदिराजींनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला
त्यानंतर आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करत इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजीची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास ही पोहचू शकत नाही असं सांगत मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे असं स्पष्टीकरण दिलं.
तर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलेलं विधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते खरं बोलले. शरद पवार, शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्या या विधानाशी सहमत असणार हा आमचा विश्वास आहे असं सांगत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर चिमटा काढला.