Maharashtra Politics ( Marathi News ) : गौरी-गणपती सणाचा आनंद द्विगुणित हवा, यासाठी राज्य सरकारकडून प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता. तशी घोषणा राज्य शासनाने यापूर्वीच केली आहे. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारपो सुरू आहेत. काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी महायुती सरकारवर आरोप केले आहेत. " यंदा गौरी मातेचा निरोप देण्यात येऊन गणेशोत्सव धडाक्यात सुरू आहे. पण, अजूनही राज्यातील ७० ते ८० टक्के भागात आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आलेला नाही, तसेच जिथे पुरविला आहे तिथे अत्यंत निकृष्ट दर्जाचा शिधा दिला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी केला. आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले.
"आनंदाचा शिधा नाही तर आनंदाचा मलिदा आहे, गणपती उत्सव सुरू झाला तरीही अजून राज्यातील ७० ते ८० टक्के भागात अजूनही आनंदाचा शिधा वितरित केलेला नाही. ज्या ठिकाणी पुरविला आहे, तो शिधा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला. गणेशोत्सव संपत आला तरीही अजून ९०० गोडाऊनमध्ये हा शिधा कधी पोहोचणार आहे?, असा सवालही लोंढे यांनी केला.
"या शिधामध्ये चना डाळ, साखर, सोयाबीन तेल इत्यादी साहित्य दिले जाणार आहे. तुकडे तुकडे असलेली, किडे पडलेली आणि निकृष्ट असलेली चना डाळ देण्यात येत आहे. यावेळी लोंढे यांनी शिधामधील डाळ दाखवली. या चना डाळ पॅकेटवर बॅच नंबर नसल्याचेही लोंढे यांनी दाखवून दिले. "साखर चमकणारी किंवा क्रिस्टल अपेक्षित असताना पिवळी साखर देत आहेत, सोयाबीन तेलाच्या प्रत्येक पॅकेट वर १० ग्रॅम कमी आहेत. अशा पध्द्तीने कोट्यवधीचा घोटाळा केला जात, असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला.
"निवडणूक निधीसाठी हा घोटाळा"
"निवडणूक निधीसाठी हा घोटाळा केला जात आहे. प्रत्यक्ष प्रत्येक गोडाऊनमध्ये जाऊन सँपल घेण्यात यावे आणि निर्देशानुसार जिओ टॅंगिंग करण्यात यावे, अशी मागणीही लोंढे यांनी केली. 'लाडकी बहीण म्हणतात आणि जनावरे ही खाणार नाहीत असे धान्य तिला देत आहेत. फडणवीस, गडकरी आणि बावनकुळे यांच्या जिल्ह्यात असा फडतूस माल देत आहेत. निवडणुकीसाठी आनंदाचा मलिदा घेतला जात आहे, असा टोलाही लोंढे यांनी महायुती सरकारला लगावला.