Join us  

शिष्टाईचा निकाल रायपूरमध्ये, बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:59 PM

एच. के. पाटील यांनी घेतली थोरातांची भेट

दीपक भातुसेनाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील गोंधळामुळे नाराज असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी रविवारी थोरातांची मुंबईत भेट घेतली. तासभर झालेल्या या भेेटीत एच. के. पाटील आणि थोरातांमध्ये सविस्तर चर्चा झाली.थोरात यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे या भेटीत पक्षश्रेष्ठींची भूमिका आणि थोरातांची भूमिका, तसेच थोरातांनी लिहलेल्या पत्राबद्दल आणि त्यांनी राजीनाम्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेबाबतही गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती लोकमतला मिळाली आहे. राजीनाम्यासारखी टोकाची भूमिका घेऊन नये, अशी पक्षाची भूमिका पाटील यांनी थोरातांसमोर मांडली. तसेच त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे पाटील माध्यमांशी बोलतानाही म्हणाले.

तासभराच्या या शिष्टाईनंतर थोरातांचे काही अंशी समाधान झाले असले तरी पूर्ण समाधान झालेले नाही. त्यामुळे या चर्चेची पुढची फेरी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याबरोबर रायपुरच्या अधिवेशनात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अधिवेशनानंतरच काँग्रेसकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न यशस्वी होणार का? थोरात राजीनामा मागे घेणार का ? हे अवलंबून असल्याचेही सांगितले जात आहे.

थोरात एवढे व्यतिथ का झाले? थोरात ज्या नगर जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीतील १२१ पदाधिकाऱ्यांचे निलंबन नाशिक पदवीधर निवडणुकीतील गोंधळानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. मात्र ही कारवाई करताना थोरातांशी चर्चाही केली नाही. निलंबित पदाधिकाऱ्यांमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकारी आहेत. त्यामुळे थोरात जास्त दुखावले गेले. थोरातांशी चर्चा न करता झालेल्या या निलंबनामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला. त्यामुळे थोरात जास्त व्यतिथ झाले आहेत.

टॅग्स :बाळासाहेब थोरातनाना पटोलेकाँग्रेससोनिया गांधी