Join us

Video:'भाजपाने पंचतारांकीत कार्यालय उभारलं, पण डॉ. आंबेडकर स्मारकाची वीटही रचली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 5:17 PM

सत्तेवर आल्यावर अवघ्या दोन वर्षांत भाजपाचे पंचतारांकीत कार्यालय उभे राहते, मात्र पाच वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची एक वीटही रचली जात नाही. हे या देशातल्या आंबेडकरी जनतेचे दुर्दैव आहे अशी टीका काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.  

मुंबई - सत्तेवर आल्यावर अवघ्या दोन वर्षांत भाजपाचे पंचतारांकीत कार्यालय उभे राहते, मात्र पाच वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची एक वीटही रचली जात नाही. हे या देशातल्या आंबेडकरी जनतेचे दुर्दैव आहे अशा शब्दांत दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.  

हे सरकार बाबासाहेबांच्या नावाने प्रतिकात्मक राजकारण करते, मात्र आंबेडकरी जनतेच्या भावनेला त्यांच्या लेखी कोणतीही किंमत नाही असा आरोप एकनाथ गायकवाड यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकनाथ गायकवाड यांनी रविवारी सकाळी दादरच्या चैत्यभुमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन केले. चैत्यभुमीला भेट दिल्यानंतर एकनाथ गायकवाड यांनी शेजारीच असलेल्या इंदू मिल येथे जाऊन स्मारकाच्या कामाची पाहणी केली. 

यावेळी बोलताना एकनाथ गायकवाड यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आज बाबासाहेबांचा जन्मदिन म्हणजे तमाम आंबेडकरी जनतेसाठी तो सन्मानदिनच आहे. मात्र आमच्या सन्मानाची या सरकारला अजिबात फिकीर नाही. कारण अडीच वर्षांपूर्वी आंबेडकर स्मारकाचे भुमिपूजन करूनही अद्याप कामाला सुरूवातही झालेली नाही. त्यावेळी बिहार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आंबेडकरी मते मिळवण्यासाठी घाईघाईत कोणतीही परवानगी नसताना पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भुमिपूजन उरकले गेले. आता मात्र वेळकाढूपणा केला जात आहे. यातूनच या सरकारची दलितविरोधी मानसिकता स्पष्ट दिसत असून आंबेडकरी जनता या निवडणुकीत या सरकारला त्यांची खरी जागा दाखवेल असा दावा एकनाथ गायकवाड यांनी केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मध्य मुंबईतून काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर गायकवाड यांच्याविरोधात भाजपा-शिवसेना युतीकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.   

टॅग्स :लोकसभा निवडणूककाँग्रेसभाजपामुंबई दक्षिण मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019