'आमच्याकडे मसाला तयार, लवकरच दणका देणार'; ईडीच्या कारवाईवरुन नाना पटोले यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:28 PM2022-03-31T14:28:33+5:302022-03-31T14:28:38+5:30
सतीश उके यांच्या घरी ईडीने छापा टाकल्यानंतर नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. उके यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
ईडीचे अधिकारी पहाटेपासूनच उके यांच्या घराची झाडाझडती करण्यात आली. त्यानंतर उके यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पत्रपरिषदेत अनेक पुरावे दिले म्हणून भाजपाने सूडबुद्धीने माझ्या भावावर ही कार्यवाही केली, असा आरोप उके यांच्या भावाने केला आहे. तसेच ईडीने आमच्या घरातून कागदपत्रे नाही, परंतु एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल घेऊन गेले असल्याची माहिती उके यांच्या भावाने दिली.य
सतीश उके यांच्या घरी ईडीने छापा टाकल्यानंतर नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या हिटलरशाहीने लोकशाही धोक्यात असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात जो कोणी बोलेल, त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करुन कारवाई करुन तोंड बंद करण्याचं पाप हे भाजप जाणीवपूर्वक करतंय. केवळ सतीश उके प्रकरणातच नाही तर अनेक प्रकरणात अशी कारवाई केली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले.
सतीश उके यांनी जस्टीस लोया प्रकरणासह अनेक प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली आहे, त्यामुळे त्यांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सौ सोनार की एक लोहार की, असं म्हणत आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार, असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिला. भाजपा जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं.
भविष्यात नाना पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील-
ईडीच्या या कारवाईनंतर आज पुन्हा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अराजकता पसरवत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारावाई केली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्या घरावर देखील ईडीच्या धाडी पडतील, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे राऊतांनी म्हटले.
ईडी गंमतीचा विषय झालाय-
संजय राऊत म्हणाले की, ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे. मात्र तो एका बाजूला झुकत असल्याचे राऊतांनी सांगितले.