Join us

मोदी-शहांच्या इशाऱ्यावरुन जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:42 PM

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रशिक्षण व प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरास भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

मुंबई : काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला ते लोक एखादे पद मिळाले नाही म्हणून, स्वार्थापोटी पक्ष सोडून जात आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्त्वाची पदे दिली. पण, आज त्याच गांधी परिवाराविरोधात चुकीची वक्तव्य करीत आहेत. गुलाम नबी आझाद यांच्यासह तथाकथित जी- २३ नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रशिक्षण व प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरास भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मी खासदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याचे वीज, पाणी कनेक्शन कापले होते. पण गुलाम नबी आझाद हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना दिल्लीत त्यांचा सरकारी बंगला व सोयीसुविधा अजूनही कायम आहेत. ते मोदी शहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला बदनाम करत आहेत, असे पटोले म्हणाले. समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, नवी मुंबई शहराध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यातून दोन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. तसेच तरुणांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्नही आहे. मुंबई- गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे, खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. तरी ते बुजवले जात नाहीत. कारण भाजप सरकारमधील लोकच या रस्त्यांचे ठेकेदार आहेत. त्यांना फक्त मलिदा खायचा आहे. हायवे असो किंवा समृद्धी महामार्ग असो, यात किती पाप लपले आहे हे येणाऱ्या काळात समजलेच, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदीअमित शाहनाना पटोलेकाँग्रेस