Join us

पंजा फक्त टायगरकडे असतो अन् तो आता काँग्रेसमय झाला आहे- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:29 PM

राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. या संघटनेचं पक्षात स्वागत करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला.

मुंबई: 'टायगर' अर्थात वाघाला इलाका नसतो. पंजा फक्त टायगरकडे असतो आणि तो आता काँग्रेसमय झाला आहे', असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवन येथे 'राष्ट्रीय बंजारा टायगर्स' संघटनेचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 

राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. या संघटनेचं पक्षात स्वागत करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. टायगर म्हणजेच वाघ आता काँग्रेसमय झाला आहे, असे पटोले म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हंशा पिकला. 'आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो', असं विधान काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी चिंतन बैठकीत केलं होतं. त्यानंतर आज पटोले यांनीही तशीच टोलेबाजी केल्याने शिवसेनेतून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार, डॉ. गजानन देसाई, रामकिशन ओझा, वाल्मीक पवार, लक्ष्मणराव भुरे,एनएसयुआयचे अमीर शेख आदी उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडलेले वाक्बाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. 'मी अशा भागातील राहतो, जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले, तर परत जाऊ देणार नाही,' असे वडेट्टीवार म्हणाले असता व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा' असे वक्तव्य केले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी 'आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे,' असे म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला होता. 

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसशिवसेना