एकत्र लढण्याबाबत मविआमध्ये संभ्रम, नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, "जे राहतील त्यांना घेऊन लढू"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:00 PM2023-04-24T12:00:48+5:302023-04-24T12:09:46+5:30
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी २०२४ च्या निवडणुका एकत्र लढणार का? या प्रश्नावर सूचक विधान केलं आहे.
मुंबई- काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी २०२४ च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या मुद्द्यावरुन सूचक विधान केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मविआ एकत्रच लढणार असल्याचे म्हटले आहे, तर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra politics)
शरद पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर संजय राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेसची भूमीका स्पष्ट आहे. जो पक्ष भाजप विरोधात आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहे. जे आमच्यासोबत आहे त्यांचे विचार वेगळे असू शकतात. आज देशात संविधान धोक्यात आलं आहे, महागाई आणि गरिबीमुळे देश संकटात आहे. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले होते?
अगदी वर्षभरावर आलेली लोकसभेची निवडणूक आणि दीड वर्षावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत आहे. तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.