Join us

Nawab Malik: “केंद्राविरोधात बोलल्यानेच ईडी कारवाई, काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 2:06 PM

Nawab Malik: केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून, आता आम्ही सामुहिकरित्या लढा देणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ED) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून, आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

ईडीच्या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे. भाजपचा हा नवा धंदा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सामुहिकरित्या लढा देणार आहेत. महाराष्ट्राची बदनामी करुन सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चालले असून जनता हे पाहत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

दरम्यान, अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक येथील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत जबाब नोंदवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते आणि अंडरवर्ल्डशी संबधत कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा नोंदवला होता.  

टॅग्स :नाना पटोलेअंमलबजावणी संचालनालयनवाब मलिककाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस