Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंविरोधात काँग्रेस नेता सर्वोच्च न्यायालयात; सहा आठवड्यांत उत्तर देण्याची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:19 AM2022-03-28T09:19:54+5:302022-03-28T09:21:51+5:30
Naseem Khan against Uddhav Thackeray: प्रकरण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे आहे. न्यायालयाने ठाकरेंसह सहा जणांना नोटीस पाठवत सहा आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आमदार दिलीप लांडेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे न्यायालयाने ठाकरेंसह सहा जणांना नोटीस पाठवत सहा आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
प्रकरण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे आहे. ठाकरे यांनी दिलीप लांडे यांचा प्रचार करताना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. प्रचाराची वेळ संपली तरी उद्धव ठाकरेंनी लांडे यांचा प्रचार केला होता, असा आरोप नसीम खान यांनी लावला आहे. नसीम खान यांनी चांदिवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. यावेळी लांडे यांनी त्यांना अवघ्या 409 मतांना पराभूत केले होते.
निवडणूक हरल्यानंतर खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाने एकतर्फी व अन्यायकारक पद्धतीने याचिका रद्द केल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण...
२० ऑक्टोबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतर प्रचार केला होता. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान घेण्यात आले होते. प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे. प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास उरले असताना प्रचार न करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असताना ठाकरे यांनी हा नियम मोडला. बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे ४०९ मतांनी निवडून आले, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे.