अहमदनगर/मुंबई : काँग्रेस नेते व बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रेमानंद रूपवते (७३) यांचे शनिवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ५ वाजता मुंबईत दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.सकाळी केम्स कॉर्नर येथील राहत्या घरी व दुपारी २ वाजेपर्यंत वांद्रे येथील चेतना महाविद्यालय येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. माजी समाजकल्याण मंत्री दिवंगत दादासाहेब रूपवते यांचे ते थोरले चिरंजीव होते. काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते. त्यांच्यामागे आई सुशीलाबाई, मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. संघराज, वैमानिक परित्याग व संग्राम असे तीन भाऊ, बहिणी अॅड. युगप्रभा बल्लाळ, डॉ. स्मृतिगंधा गायकवाड व डॉ. क्रांती कोळगे, मुली उत्कर्षा व बंधमुक्ता, जावई, मेहुणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत मधुकर चौधरी यांचे ते जावई तर चेतना महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका स्नेहजा रूपवते यांचे पती होते. अहमदनगर येथील बहुजन शिक्षण संघाचे ते कार्यकारी विश्वस्त होते.
काँग्रेस नेते प्रेमानंद रूपवते यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:20 AM