मुंबई- शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी २४ तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अन् गुलाबराव पाटील थेट गुवाहटीत पोहचले; नेमका प्लॅन काय?
संजय राऊतांच्या या विधानानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, आम्हाला कळत नाही. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?, त्यांना पुन्हा भाजपासोबत जायचं आहे का?, हे त्यांनी स्पष्ट करावं असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यू- टर्न घेतील, असे मला वाटत नाही. मात्र, त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आमच्या हातात काहीच नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कोणती भूमिका घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही ट्विट करत शिवसेनेला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल, असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा संजय रऊत यांनी केला. ते म्हणाले की, मी इथे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी कितीही फोटो व्हिडीओ पाठवावेत. मात्र ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा त्यातील २१ आमदार हे शिवसेनेचे असतील या आमदारांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला आहे. तसेच जर विधानसभेत हा संघर्ष आला तर तिथेही महाविकास आघाडीचा विजय होईल, इतका आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.