मुंबई: सन २०१९ निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेचे स्पष्ट बहुमत दिसत होते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पुन्हा विरोधी बाकांवर बसायची इच्छा नव्हती. निवडणूक निकालानंतर चित्र बदलत गेले. तेव्हाच काही पत्रकारांसोबत बसलेलो असताना भाजपरहित सरकारबाबत बोललो होतो. तोच मुद्दा प्रकाशात आणला गेला. भाजपला विरोधात बसवता येणे शक्य असले, तर त्यासंदर्भातील प्रस्तावाबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणे केले जाईल, असे तेव्हा ठरले. आणि पुढे त्यातून महाविकास आघाडीचे सरकार आले, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.
लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी ‘टू द पॉइंट’अंतर्गत पृथ्वीराज चव्हाण विशेष मुलाखत घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी आणि भाजप तसेच काँग्रेस पक्षाची वाटचाल यासह अनेक विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणाने मते मांडली. निवडणुकीच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजपने अर्थात यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण केले ते सर्वांना माहिती आहे. त्यावेळी साम, दाम, दंड, भेद या सगळ्याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून ४० प्रमुख नेते भाजपने फोडले. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार असे दिसत होते. फडणवीस यांचा कार्यकाळ पाहता पुन्हा ते नकोत, अशी भावना मनात होती. निवडणुकीच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी तशी चर्चाही झाली होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटत चालले आहे
महागाई, बेरोजगारीचा मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवाद आणि धार्मिक उन्माद वाढवला जातोय, या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे. निश्चित यात शंका नाही. देशातील वाटचाल मध्ययुगीन काळात चाललीय. केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटत चालले आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. देशातील वाटचाल मध्ययुगीन काळाकडे चालली आहे. केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटत चालले आहे. रशिया-युक्रेन युद्धाची त्यात भर पडली आहे. महागाई जीवघेणी होत चालली आहे. सरकारला यातून मार्ग काढता येत नाही. सरकारकूडन दिलासा मिळेल, असे वाटत नाही. अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करून धार्मिकतेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक द्वेष आणि हिंदुत्वाच्या राजकारण हे जाणूनबुजून केले जात आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
देशातील एकूणच परिस्थिती चिंताजनक
देशातील एकंदरीत चिंताजनक परिस्थिती आहे. अनेक तज्ज्ञांनी मोदी सरकारला सल्लाही दिला. सवंग लोकप्रियेसाठी मोठे निर्णय घेऊ नका तसेच कर्ज न वाढवण्याबाबत सांगितले आहे. मात्र, मोदी सरकार त्यातून कसा मार्ग काढते, ते पाहावे लागेल. कोरोनामध्ये गेलेल्या नोकऱ्या अद्यापही परत मिळालेल्या नाही. वाढत्या तेलाच्या किमतीमुळे आणखी अडचणी वाढत आहेत. जगातील सर्वांत महागडे पेट्रोल आणि डिझेल भारतात मिळत आहे, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.