मुंबई: तब्बल २४ वर्षानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांचाही विजय झाला. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे आता घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने महाविकास आघाडीला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या जोरावर दोन उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखणाऱ्या शिवसेनेला भाजपने धक्का दिला आहे. संजय पवार पराभूत झाले असून, भाजप उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलेला असताना काँग्रेसकडून यासंदर्भात सूचक ट्विट करत फुटलेल्या आमदारांनाबाबत महाविकास आघाडीला सल्ला दिला आहे.
लगानमधील लाखा कोण?
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी लगान चित्रपटाचे उदाहरण देत भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेल्या आमदारांना टोला लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले ‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’ कोण आहेत हे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषद निवडणुकीआगोदर तात्काळ शोधून काढावे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या काही आमदारांची मते बाद ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात मध्यरात्री निवडणूक आयोगाने निर्णय देत महाविकास आघाडीचे सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. मात्र, त्यानंतर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपचे तीन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे सहावी अतिरिक्त जागा भाजपने जिंकल्याचे स्पष्ट झाले.