Join us

Palghar Mob Lynching: 'पालघर ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणी अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपाचे आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 3:38 PM

पालघरच्या या दुर्देवी घटनेवरून भाजपा धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे याची भाजपाला लाज वाटली पाहिजे.

मुंबई: पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या घटनेवरुन रविवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर वादंग उठलं असून संबंधित घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच या घटनेनंतर राज्य सरकारवरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. मात्र आता पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना व सल्ले देणाऱ्या विरोधकांवर काँग्रेसने देखील निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत ट्विट करत म्हणाले की, पालघरच्या या दुर्देवी घटनेवरून भाजपा धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे याची भाजपाला लाज वाटली पाहिजे. गेल्या ५ वर्षात सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षंभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली आहे. तसेच प्रत्यक्षात या प्रकरणात अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपाचे आहेत,' असा दावाही सचिन सावंत यांनी केला आहे.

'मॉब लिंचिंगचे केंद्र असलेल्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करणं हा शहाजोगपणा आहे. खरंतर गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपाचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपाचा सरंपच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. लिंचिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपाचे लोक आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. काही मुस्लिम वेशांतर करून मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून करोना पसरवतात, अशी अफवा पालघरमध्ये होती. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी देखील सचिन सावंत यांनी केली आहे.

मॉब लिचिंग प्रकार अन्य राज्यात अथवा गेल्या ५ वर्षात राज्यातही घडले आहेत. हे घडायला नको ही आपली संस्कृती नाही. मला राजकारण करायचं नाही. पण ही घटना पालघरच्या ११० किमी अंतरावर म्हणजे केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीनजीक घडलं. पालघरमध्ये ज्या गावात ही घटना घडली हा दुर्गम भाग आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे बंद करण्याचं आवाहन केलं होतं त्या दिवशी ही घटना घडली तेव्हा रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे ५ पर्यंत पालघरच्या पोलीस अधीक्षक आणि पोलिसांनी जंगलात फिरून १०० पेक्षा जास्त आरोपींना पकडलं होतं. हे आरोपी तुरुंगात आहेत. त्यांना १८ तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर ३० तारखेपर्यंत त्यांना कस्टडीत ठेवलं आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, या घटनेतील कोणत्याही दोषींना सोडणार नाही. सीआयडी गुन्हे शाखेचे डीआयडी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुढील तपास होईल. या घटनेतील जबाबदार सगळेच तुरुंगात आहेत. जे फरार आहेत त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. हिंदू-मुस्लीम नजरेने या घटनेकडे पाहू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.  

पालघरमध्ये नेमकं काय घडलं?

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.

हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेसचिन सावंतकाँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकारयोगी आदित्यनाथ