Join us

'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेसारखेच; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 4:09 PM

आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली.

कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केली.

चंद्रकांत पाटलांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनीही चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

सचिन सावंत ट्विटरद्वारे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांची भाषा मनुवादी संघाच्या शिकवणीची आहे. स्त्री जीवन 'चूल आणि मूल' इतपतच. '१० मूले, ४ मुले काढा'उगीच म्हणत नाहीत. तसेच स्त्री संपर्क विषसमान, म्हणूनच संघ कार्यकारिणीत स्त्रीया नाहीत. 'मसणात जा' म्हणणे केतकी चितळेच्या धर्तीवर आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. 

दरम्यान, राज्यात ओबीसी समाज्याच्या राजकीय आरक्षणावरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. यातच, मुंबईसह १४ महानगरपालिकांत ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे राजकीय पक्ष तथा ओबीसी समाजातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याच मुद्द्यावर, मध्य प्रदेश सरकारचे अनुकरण करत, राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीला घेऊन भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात भाजपाचे विविध नेते सहभागी झाले होते.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलअन्य मागासवर्गीय जातीसचिन सावंत