मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतने आता कृषी विधेयकांवरुन एक ट्विट केले आहे. मात्र या नव्या ट्विटमुळे कंगना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या ट्विटनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.
कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर सतत सक्रिय असून एकामागून एक ट्विट करत आहे. यावेळी कंगनाने केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्विट रिट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार आहे. शेतीमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. बळीराजाच्या साह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदींचं हेच ट्विट कंगनाने रिट्विट केलं असून या ट्विटमध्ये कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कंगना रणौतने ट्विट करत म्हटले की, 'पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे, असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. तसेच हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAAला विरोध केला होता. सीएएविरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही, असं कंगनाने म्हटले आहे. कंगनाच्या या विधानावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.
आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत, असं सचिन सावंत यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयकं मांडली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ही विधेयकं सोमवारी लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. मात्र या कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे.
मुंबईला POK नाही तर सीरिया म्हणायला हवे होते- कंगना
मुंबईत सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटल्याने मला अपशब्द बोलले गेलेत. माझे कार्यालय उद्ध्वस्त केले गेले. मला शिवीगाळ करण्यात आली. माझे थोबाड फोडण्याची धमकी दिली दिली. मला मुंबई पीओकेसारखी वाटू लागलीय, असे मी म्हणाले होते. मी पीओके म्हटले होते. पण माझ्यामते मी सीरिया म्हणायला हवे होते. कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भारताची तुलना सीरियाशी केली होती. मात्र त्यावेळी त्यांच्यावर ना कोणी टीका केली, ना त्यांचे घर तोडले. माझ्यासोबतच या लोकांना कसली अडचण आहे? असा सवाल कंगनाने केला.
मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली होती कंगना?
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर उघडपणे बोलणा-या कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे वक्तव्य केले होते. ‘मला गुंड, माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटू लागलीय. मुंबईत मला हिमाचल प्रदेश किंवा थेट केंद्र सरकारची सुरक्षा हवी़ मुंबई पोलिसांची नको,’असे ट्विट तिने केले होते.
मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे ट्विट केल्यानंतर कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने यानंतर दिला होता. एवढेच नाही तर कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते़ अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्षपणे तिच्या चुकीची जाणीव करून दिली होती.
संजय राऊत यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले होते. यावर कंगनाने एक ट्विट करत, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती़ ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. याआधी मुबंईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्याआणि आता उघडपणे धमक्या मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’असे ट्विट कंगनाने केले होते.