मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. अमृता फडणवीस यांनी फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी ठाकरे होऊ शकत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेकडूही अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेकडून देखील जसेच तसे प्रत्युत्तर देण्यात आले होते. अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्विटरवॉर सुरु असताना आता मुख्यमंत्र्यांच निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधील भितींचीही भर पडली आहे. वर्षा बंगाल्यामधील भिंतीवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ज्याने कोणी मजकूर लिहलं आहे त्यांच तोंड काळं झालं आहे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
त्यांनी तोंड काळं करून घेतले; वर्षा बंगल्यावरील मजकूरावरून संजय राऊतांची टीका
वर्षा बंगलाच्या भिंतीवर लिहलेल्या मजकूरावरुन राजकारण तापलं असताना आता काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिण्यात आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे नसल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याने लिहलं असेल तर त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. परंतु जर देवेंद्र फडणवीस यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांनी किंवा लहान मुलानं लिहिले असेल तर त्या परिवाराची जबाबदारी आहे की लहान मुलांना समज द्यावी असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं आहे.
वर्षा बंगलाच्या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स असं लिहण्यात आलं आहे. तसेच हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. 'यूटी' म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात असले तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजानं लिहिलं असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बंगला सोडण्यापूर्वी आम्ही एक एक कोपरा चेक केला होता. तेव्हा असं काहीही लिहिलेलं आढळलं नव्हतं. तसेच दिविजानं तर असं काही लिहिण्याचा प्रश्नच नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आमची बदनामी करण्यासाठी अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करत असल्याचा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.