मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी “राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर आहे,” असे म्हणत त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला.
“राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे,” असं म्हणत सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यासोबतच राज्यपालांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.