Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंडाळी केल्यानंतर पराकोटीला पोहोचलेल्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता काँग्रेसच्या कार्यकारिणीतील एका नेत्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले हे बरे झाले. गेली अडीच वर्ष फक्त पैसे खाणे सुरू होते, असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते. कोणताही कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे. त्यामुळे हे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला आहे, अशी खदखद एका पदाधिकाऱ्याने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलून दाखवली आणि पक्षश्रेष्ठींच्या कारभाराचे वाभाडेच काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आशीष दुआ, सोनल पटेल यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक माजी मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत हा सर्व प्रकार घडला आहे.
बाळासाहेब थोरातांकडून नाराजी दूर केल्याचा दावा
या बैठकीत नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी माजी मंत्र्यांविरोधात उघडपणे नाराजी बोलून दाखविली आहे. गेली अडीच वर्षे आपले मंत्री फक्त पैसे खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत, त्यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. म्हात्रे यांच्या भूमिकेला, इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही बरोबर बोलत आहात, असे सांगत त्यांचे समर्थनही केले. केंद्रीय नेत्यांसमोर अशाप्रकारचे आरोप झाल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दुसरीकडे याबाबत खुलासा केल्यानंतर त्या कार्यकर्त्याचे समाधान झाले असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, विधान परिषदेत निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगबाबत ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी अहवाल हायकंमाडकडे सादर केलेला असतानाही संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने अनेकांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीला पक्षातील या अतंर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बैठकीमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत रमाकांत म्हात्रे यांना विचारले असता, हा आमच्या घरातील विषय असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.