राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यालाही राज्यात सुरुवात झालीय. पण या लसीकरण मोहीमेत अनेक अडचणी असल्याचं समोर येत आहे. आता तर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेत्यानं आरोग्य यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक धक्कादायक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी लसीकरण केंद्रावरील त्रुटींवर बोट ठेवलं आहे. संजय निरुपम यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत मुंबईतील बीकेसीतील लसीकरण केंद्रात उडालेला गदारोळ दिसतो आहे. लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी चिंतादायक आहे.
"काल महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठीचं अॅप बंद पडलं. लोक त्रासलेले होते. आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण केंद्र विना माय-बापाचं पाहायला मिळालं. ६ मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होणार आहे. त्यांचा धंदा होण्यासाठी तर सरकारी यंत्रणा फेल होत नाहीय ना?", असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
निरुपम यांनी ट्विट केलेला व्हिडिओ बीकेसी येथील लसीकरण केंद्राचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओत लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत असून धक्काबुक्की देखील सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर सुरक्षा व्यवस्था नव्हती का? असा सवाल आता या व्हिडिओवरुन उपस्थित केला जात आहे.
कोविन- ॲप अधिक सक्षम बनवणे आवश्यक - माजी आरोग्य मंत्रीमुंबईत आणि महाराष्ट्रात तसेच देशाच्या काही भागात कोविन- ॲप च्या तांत्रिक बिघाडामुळे नेस्को, कुपर सेव्हन हिल्स, बी.के.सी सारख्या लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याचे चित्र दोन दिवस दिसले. या सर्वांसाठी केंद्र सरकारने कोविन- ॲप हाअधिक सक्षम बनवणे आवश्यक आहे. आयटी क्षेत्रात अनेक भारतीय इंजिनियर जगाला सेवा देत आहेत. त्यामुळे ' कोविनॲप ' हा तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी केंद्राने सर्वतोपरी प्रयत्न करावे असे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर वॉक- इन लसीकरणासाठी कोविन- ॲप हा अधिक सुधारित हवा आणि या सर्व तांत्रिक गोंधळामुळे लसीकरण ठप्प झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.